मुंबई : मोतीलाल नगरमधील पुर्नविकास प्रकल्पाच्या सार्वजनिक बैठकीत नागरिकांशी बोलताना म्हाडा प्राधिकरणाचे सीईओ संजीव जयस्वाल यांनी धमकी दिल्याचे आणि धार्मिक तेढ उत्पन्न होईल, असे वक्तव्य केल्या आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मोतीलाल नगरमधील सार्वजनिक बैठकीत नागरिकांशी बोलताना झालेल्या वादानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याविरोधात प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
बैठकीदरम्यान नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप करत तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत ३७ सदस्यांनी स्वाक्षरी केलेली पाच पानी तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या रहिवाशांनी आम्हाला प्रकल्पावर धमकावणारा अधिकारी नको, अशी भूमिका घेतली आहे.
मोतीलाल नगरमधील सार्वजनिक बैठकीत पुनर्विकासासंदर्भात नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर वाद निर्माण झाला. याचदरम्यान संजीव जयस्वाल यांनी नागरिकांशी आक्षेपार्ह भाषेत संवाद साधत धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच बैठकीत केलेल्या काही वक्तव्यांमुळे धार्मिक तेढ निर्माण होईल, असा दावा करत त्याबाबतही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
या तक्रारीत बैठकीतील संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आला असून, जयस्वाल यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी भीती तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ आक्षेपार्ह वक्तव्य नव्हे, तर धमकी आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, ३७ सदस्यांच्या स्वाक्षरीसह दाखल झालेल्या या तक्रारीमुळे मोतीलाल नगरमधील वाद आता थेट पोलीस तपासाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गोरेगाव पोलीस या तक्रारीवर काय भूमिका घेतात आणि पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.